Wednesday, January 5, 2011

मराठी शुक्रवार

येत्या शुक्रवारी तीन हिंदी सिनेमे रिलीज होतायंत. यातला 'जेसिका' वगळला तर उरल्या  ’विकल्प' आणि ’इम्पेशण्ट विवेक' या दोघांवर मराठीचं वर्चस्व असेल. कारण एकाचा दिग्दर्शक आणि विषय मराठी आहे. तर दुसऱ्यातल्या दोन मुख्य भूमिकांमध्ये मराठी चेहरेच असतील.

'विकल्प' सिनेमात एका मराठी मुलीच्या संघर्षाची कथा पाहायला मिळेल. तर दुसऱ्या 'इम्पेशण्ट विवेक' या रोमकॉम सिनेमात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दोन मराठी चेहरे असतील.



' विकल्प'चं दिग्दर्शन सचिन कारंडेने केलं असून, त्याचा विषय एका मराठी मुलीच्या स्ट्रगलभोवती फिरतो. गेल्या डिसेंबरमध्येच त्याचा 'पे बॅक' रिलीज झाला होता. 'अनाथालयात राहणाऱ्या हृषिका या मराठी मुलीची कथा यात आहे. आपल्या कर्तबगारीवर ती सॉफ्टवेअर इंजिनीअर होते. पण, ती मराठी आहे हे समजल्यावर तिला नकारात्मक वागणूक मिळू लागते. अखेर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी ती परदेश गाठते आणि यशस्वी होऊन दाखवते. तिच्या स्ट्रगलची कथा या सिनेमात दिसेल,' सचिन सांगतो. अभिनेता निर्मल पांडेचं अखेरचं दर्शनही या सिनेमात होणार आहे.

' विकल्प'च्याच जोडीला 'इम्पेशण्ट विवेक' हा दुसरा सिनेमा येतोय. यात विवेक सुदर्शन हा नवा चेहरा मुख्य भूमिकेत असला, तरी त्याच्याबरोबर हृषिकेश जोशी हा मराठीतला गुणी चेहरा दिसेल. हृषिकेशच्या 'कमिने'मधल्या भूमिकेचं कौतुक झालं होतं. सचिन कारंडेच्या 'पे बॅक'मध्येही तो होता. आता 'इम्पेशण्ट विवेक'मधून तो कॉमिक रोल साकारतोय. 'यात जग्गी उर्फ आयडिया सिंग हे पात्र मी केलंय. हिरोचं एका मुलीवर प्रेम असतं. तिला इम्प्रेस करण्यासाठी जग्गी त्याला सल्ले देतो आणि हे दोघे अडकत जातात. त्या अडचणींतून बाहेर येईपर्यंत दोघांचे बारा वाजलेले असतात. या रोम-कॉममध्ये कॉमेडीची मोठी जबाबदारी माझ्यावर आहे,' हृषिकेश सांगतो. यात लीड अॅक्ट्रेस म्हणून मराठमोळी सयाली भगतही काम करतेय.

स्वत:ला सिद्ध करण्यासाठी हे तीनही कलाकार आपापल्या कलाकृतींमधून एकमेकांसमोर उभे ठाकतायत. सिनेमे हिंदी असले, तरी दिग्दर्शक, विषय आणि कलाकारांमुळे शुक्रवारी बॉलिवुडमध्ये मराठी चेहऱ्यांचं वर्चस्व असेल.

No comments: