Thursday, January 6, 2011

चित्रकार एम. एफ. हुसेन अनुष्का शर्मा वर फिदा

एकेकाळी माधुरी दीक्षितच्या प्रेमात खोलवर बुडालेले प्रसिद्ध आणि वादग्रस्त चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्या ‘ चिरतरुण ’ मनाच्या कॅनव्हासवर सध्या अनुष्का शर्मा या नवोदित नायिकेची प्रतिमा अवतरली आहे. तिचं दिसणं, हसणं, वागणं-बोलणं, पडद्यावरचं वावरणं या सगळ्यावर हा रसिक चित्रकार ‘ फुल टू फिदा ’ झालाय. अनुष्कावरील या प्रेमाखातरच हुसेन यांनी तिचा ‘ बँड बाजा बारात ’ हा चित्रपट आत्तापर्यंत आठ वेळा बघितलाय आणि पुढेही पाहण्याची त्यांची मनापासून इच्छा आहे.


९५ वर्षीय एम. एफ. हुसेन जितके चित्रवेडे आहेत, तितकेच चित्रपटवेडेही. पण म्हणून ते कुठलाही, कुणाचाही चित्रपट बघतात का ? तर नाही... त्यांचा स्वतःचा असा एक चॉइस आहे, क्लास आहे. माधुरी दीक्षितच्या माधुर्यावर, तब्बूच्या अभिनयावर त्यांनी जीवापाड प्रेम केलं. ‘ हम आपके हैं कौन ’ त्यांनी तब्बल ७३ वेळा पाहिलाय. त्यानंतर अमृता रावच्या निरागस चेह-यानं या सर्जनशील कलावंताला भुरळ पाडली. तिचा ‘ विवाह ’ हा चित्रपट त्यांनी २० वेळा पाहिला आहे.

आता माधुरी, तब्बू आणि अमृताच्या पंक्तीत अनुष्का शर्मा विराजमान झाली आहे. दोहा इथं मुक्कामी असलेले हुसेन अनेकदा मित्रांसोबत, कुटुंबियांसोबत दुबईला येत असतात. अलीकडे ते जेव्हा जेव्हा दुबईत येतात तेव्हा ‘ बँड बाजा बारात ’ आवर्जून बघतातच बघतात. विशेष म्हणजे, हा सिनेमा बघताना त्यांना चष्माही लावावा लागत नाही. मी अनुष्काला बघतो तेव्हा मला आपोआपच स्वच्छ आणि स्पष्ट दिसू लागतं, असं ते म्हणतात. अबब, केवढं हे प्रेम !!!

अनुष्काचा पहिला चित्रपट, रब ने बना दी जोडी ठीकठाक होता. परंतु, ‘ बँड बाजा बारात ’ मधून अनुष्कानं आपल्यातील टॅलेंटचं दर्शन घडवलंय. सहजसुंदर अभिनय काय असतो हे तिनं यातून दाखवून दिलंय, अशी दाद हुसेन देतात. त्यामुळे अनुष्का आता जेव्हा कधी दोहा किंवा दुबईला जाईल, तेव्हा एका जगप्रसिद्ध चित्रकारानं काढलेलं पोर्ट्रेट तिला भेट म्हणून मिळणार, हे पक्कं आहे.

No comments: